८ जूनची ती काळरात्र संपताच सकाळी (९ जून) फोन आला. “दादा गेले”. “कशाने?” “कळलेच नाही.” “पण सध्या ते आजारी होते का?” कारण आजारी असले किंवा प्रकृत्ती चिंताजनक असेल तर किमान मनाची तयारी तरी असते. हा ‘कर्मयोगी’ असा एकाएकी कसा काळाच्या पडद्याआड गेला? हे तर कर्मयोग्याचं जाणं !
माझ्यावर मोठा आघातच झाला. अशा वेळी मदतीला धावून आले ते ग. दि. माडगुळकरांचे शब्द…
“मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.”
दादांवर प्रेम करणाऱ्यांचं सांत्वन करता आले तर एवढ्या शब्दानेच करता आलं असतं. दादांच्या आठवणींनी दचकायलाच झालं. मोठ्या काळाचा स्नेहबंध. त्यामुळे घरातील कुणीतरी दुरावल्याची बेचैनी मनावर आली. थोडा वेळ सुन्न बसून राहिलो. पण शेवटचे भेटायला हवे, या विचाराने उठलो आणि गाडी घेऊन तडक ‘शिवनेरी’ बंगल्यात पोहोचलो. तो पोहोचण्याचा छोटा काळही मोठा भासत होता. बंगल्यात गेलो तर दादा शांत, प्रसन्न चेहऱ्याने ‘चिरविश्रांती’ घेत होते. पंचवीस वर्षांहून अधिक काळ लोटला होता पण आज होत असलेल्या आमच्या गाठीभेटीत प्रथमच दादांकडून नेहमीचे स्वागत करणे घडत नव्हते. बंगल्यात मोठी गर्दी असूनही हालचाली मंदावलेल्या, संपूर्ण वातावरण जडपणाने भारलेलं. कोणी कोणाशी बोलत नाही. सारं कसं निःशब्द… साश्रुपूर्ण…
अश्रृंनी डबडबलेल्या आणि भावनांनी उचंबळून आलेल्या माझ्या हृदयात त्याप्रसंगी अनेक चलचित्रे आणि गत आठवणींचे डोंगर उभे राहिले. कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, अत्यंत तत्त्वदर्शी, कडक शिस्तीचे शिक्षक, प्राचार्य ते सेवाव्रती आमदार आणि त्याहीपेक्षा माझ्यासारख्या अनेकांना अर्थपूर्ण जगणं शिकविणारे एक मार्गदर्शक आधारवड. समोर शरपंजरी पडलेल्या भिष्मासारखे महान भासू लागले. त्यांचं कार्य कर्तृत्व, राजकारण, समाजकारण समोर दिसू लागले. उभी हयात स्वाभिमानाने वावरणारे आणि शिक्षण तसेच लोककार्यासाठी समर्पित जीवन जगून अन्याय, गुलामी लाथाडणारे त्यांचे विचार विजेसारखे मनात चमकू लागले. त्यांनी घडविलेल्या, अनेक ज्ञानक्षेत्रे पादाक्रांत करणाऱ्या समाजधुरिणांची मांदियाळीच डोळ्यांसमोर तरळू लागली आणि त्याचबरोबर एवढं मोठं डोंगराएवढं काम उभं करणाऱ्या शिक्षणमहर्षी, सेवाव्रती कर्मवीरांच्या प्रतीरुपाचा, क्रांतीचा विचार प्रेरणेच्या रुपाने येणाऱ्या नव्या भावी पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, असं एक मन दुसऱ्या मनाला आर्जव, हट्ट करु लागले आणि त्याच वेळी दादांवर स्मृतिग्रंथ निर्मितीची कल्पना सुचली.
मरणोपरांत इतर क्रियाकर्मे आटोपल्यानंतर दादांच्या सहकारी, स्नेही,विद्यार्थी, मान्यवर आणि कुटुंबीयांसमोर एकत्रितपणे स्मृतिग्रंथ निर्मितीचा विचार ठेवून सर्वांच्या प्रांजळ संमतीने स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्याचा एकमुखी निर्णय घेऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. या स्मृतिग्रंथाच्या निमित्ताने आम्ही दादांच्या संपर्कातील राजकारणी, नेतेमंडळी, आमदार, खासदार, सहकारी, स्नेही, विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक यांना भेटू लागलो, तसा तसा दादांचा मोठेपणा आभाळाला भिडू लागला. कुठेतरी या साऱ्यांचा मनातून हेवा वाटू लागला. कारण या सर्वांना दादांचा सहवास उदंड लाभला होता. खरंच खूप सुदैवी होती ही मंडळी! एका धिरोदत्त तत्त्वज्ञानी… तरीही राजकारणी, समाजकारणी आणि एका शिक्षण धुरिणाचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून दादा नावाचा गुलामीची, कर्मकांडाची ऐतिहासिक विकृतीची चिरफाड करणारा नायक समोर येऊ लागला; समाज जागृत करण्यासाठीचा त्यांचा संघर्ष समोर येऊ लागला. बुद्ध, चार्वाक, महावीर ते शिव-शाहू, फुले, आंबेडकरांचा पदपथ लक्षात येऊ लागला.
हजारो वर्षांपासून या देशात सांस्कृतिक संघर्ष चालू आहे. त्या काळात येथील मूळ लोकसंस्कृती नष्ट करुन गुलामी लादण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याविरुद्ध बुद्धापासून छत्रपती शिवरायांपर्यंत सर्वांनी आपले जीवन संघर्ष करुन संपविले आहे. या महापुरुषानंतर त्यांचे वंशज पुन्हा गुलामगिरीकडे गेले आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना समजाऊन न घेणे. ज्यांच्यासाठी संघर्ष करावा तिच माणसे नादान निघतात. जिवंतपणी अहंकारातून विरोध करतात. त्यांच्यासाठी महामानवाचे ‘तीळ तीळ तुटणे’ व ‘लाभावीण प्रीती’ करणे त्यांना कळत नाही. पुन्हा पुतळा संस्कृतीचा, उत्सव, जयंत्या मयंत्याचा उगम होतो, परंतु तेव्हा वेळ गेलेली असते. महापुरुषांना जिवंतपणे न स्वीकारणे हा येथील मराठा व बहुजन समाजाचा मोठा दुर्गुण आहे. त्यामुळे क्रांत्या असफल झाल्या आहेत. पुन्हा पुन्हा गुलामीकडे बहुजन समाजाची वाटचाल झाली आहे. यातून पुढे नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, दादांच्या कार्यकर्तृत्वातून क्रांतिकारी पदपथ निर्माण होऊन पथदर्शी पिढीचं निर्माण व्हावं. स्वराज्य-सुराज्य-शिवराज्य-शिवराष्ट्राच्या कल्पनांना बळ यावं यासाठी ‘कर्मयोगी आमदार शिवाजीराव पाटील’ हा प्रस्तुत स्मृतिग्रंथ प्रकाशित करताना आम्हाला विशेष
आनंद होत आहे.
दादांवर आधारीत स्मृतिग्रंथाचं संपादन होतंय, असं समजल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून लेखांचा प्रचंड पाऊस पडला. आम्ही केलेले नियोजन व पानांची मर्यादा यामुळे सर्वच लेख प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट करणे शक्य नव्हते. तसेच ग्रंथाचे काम पूर्ण झाल्यावरही काही मान्यवरांचे लेख मिळाले. वेळेअभावी त्यांचा समावेश यात करता आला नाही याचे शल्य राहिले. दादांच्या राजकारणी, समाजकारणी, तत्त्वज्ञानी, शिक्षक, प्राचार्य या ओळखीबरोबरही दादांची कौटुंबिक, पार्श्वभूमी माहित व्हावी म्हणून त्यांचे कौटुंबिक लेखही या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. त्यामुळे वाचकांची जिज्ञासापूर्ती होईल, यात शंका नाही. शब्दमर्यादांच्या पलीकडचे ‘दादा’ हे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जीवनातील शेकडो पैलूंवर लेखन करता येईल. त्यांच्या एकंदर जीवनातील हा एक टक्काही भाग नाही, याची नम्र जाणीव आम्हाला आहे.
या स्मृतिग्रंथासाठी लेख पाठविणाऱ्यांचे, सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार ! ग्रंथातील लेख व आशयाचे पुनरावलोकन, संस्करण, शुद्धलेखन आणि साहित्यमूल्य यासाठी मेहनत घेणारे बँक ऑफ बडोदाचे मुख्य व्यवस्थापक, मा. बळीराम आवटेसाहेब, यांना धन्यवाद देतो, त्यांना सहायक म्हणून काम केलेले डॉ. ज्ञानेश्वर थोरात, संत साहित्याचे अभ्यासक यांनाही मनःपूर्वक धन्यवाद देतो आणि संपादकीय मंडळातील सर्व सदस्यांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद प्रकट करतो.
प्रस्तुत ग्रंथसंपादनाला संमती देऊन सर्व प्रकारचे सहकार्य करणारे श्री. उदय शिवाजीराव पाटील, चि. रणजित, आई व सौ. छाया वहिनी यांचे आभार प्रकट करणे परकेपणाचे होईल. म्हणून त्यांच्या ऋणातच राहणे आत्मनंदाचे होईल.
प्रस्तुत स्मृतिग्रंथ संपादनाचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी माझ्यावर टाकून दिलेले निरलस प्रेम व स्वातंत्र्याने माझा सन्मान वाढविल्याने मी संपादकीय मंडळाचा मनःपूर्वक कृतज्ञ आहे.
प्रस्तुत स्मृतिग्रंथाने नवी पिढी क्रांतिकार्यासाठी चेतावी, सत्यासाठी, समृद्ध, मानवतावादी, शिवराज्याच्या निर्माणासाठी सिद्ध व्हावी व दादा त्यांचेसाठी कायम प्रेरणादायक राहतील, असा विश्वास वाटतो. कविवर्य नारायण सुर्वेच्या शब्दांत दादांचे प्रतिबिंब दिसते…
“झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते, अशी आमंत्रणे आम्हालाही आलीत, नाहीच असे नाही. असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असे नाही. शास्त्राने दडवावा अर्थ, आम्ही फक्त टाळच कुटावे आयुष्याचा अनुवादच करा सांगणारे खूप, नाहीत असे नाही. अरे इमान विकत घेणारी दुकाने पाड्या पाड्यावर, डोकी गहाण टाकणारे महाभाग, नाहीत असेही नाही. अशा बेईमान उजेडात एक वात जपून नेताना, विझता विझता स्वतःला सावरलेच नाही, असेही नाही.”
।। जय जिजाऊ ।। ।। जय शिवराय. ।।
अॅड. सुनील मा. बांगर
(शिवचरित्र अभ्यासक),
संस्थापक / अध्यक्ष-राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.